सभासद म्हणजे काय?www.marathihelp.com

सभासद म्हणजे काय?
सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सदस्य म्हणून यथोचितरित्या दाखल करुन घेतलेली व्यक्ती होय.

सामान्य लोकांच्या हितासाठी सहकारी संस्थेची स्थापना प्रवर्तक करीत असतात. समान उद्‌दिष्टे असणाऱ्या व्यक्तीस्वेच्छेने एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतात. सहकारी संस्थेची नोंदणी करत असताना नोंदणी अर्जावर प्रवर्तक म्हणून ज्या व्यक्तींनी सह्या केलेल्या असतात, त्यांना संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदत्व प्राप्त होते. सहकारी संस्थेचे ते प्रथम सभासद म्हणून ओळखले जातात.

सभासदांचे प्रकार :

१) क्रियाशील सभासद : जो संस्थेच्या कारभारात भाग घेतो आणि उपविधीमध्ये नमूद केलेल्या संस्थेच्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादेत वापर करतो त्याला क्रियाशील सभासद असे म्हणतात. सभासद सभासदत्वाच्या सर्व अटींची पूर्तता करतो. क्रियाशील सभासदास कायद्यातील तरतुदीनुसार सर्व अधिकार आणि हक्क मिळतात. किर्याशील सभासदास अधिमंडळाच्या वार्षिक सभा तसेच अधिमंडळाच्या विशेष सभेची सूचना मिळविण्याचा, सभेतील चर्चेत सहभाग घेण्याचा, मतदान करण्याचा, लाभांश मिळविण्याचा, संस्थेची हिशेबपुस्तके पाहण्याचा अधिकार असतो. क्रियाशील सभासदाने अधिमंडळाच्या सदस्यांच्या वार्षिकसभेच्या लागोपाठ पाच वर्षाच्या कालावधीत किमान एका सभेला हजर राहिले पाहीजे.

२) अक्रियाशील सभासद : जो सदस्य अधिमंडळाच्या वार्षिक सभेच्या लागोपाठ पाच वर्षाच्या कालावधीमध्ये किमान एका सभेला हजर राहणार नाही आणि संस्थेच्या उपविधीत नमूद केल्याप्रमाणे लागोपाठच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये किमान एकदा सेवांचा किमान मर्यादेत वापर करणार नाही असा कोणताही सदस्य अक्रियाशील सभासद म्हणून समजला जातो. अशा सदस्याचे अक्रियाशील सदस्य म्हणून वर्गीकरण केले जाते तेव्हा त्याला वित्तीय वर्ष समाप्त होण्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत संस्थेने कळविले पाहीजे. असे वर्गीकरण केल्याच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षात जर अशा सदस्याने क्रियाशील सदस्यासाठीचे निकष पूर्ण केले तर तो पुन्हा क्रियाशील सदस्य होण्यास पात्र ठरतो. मात्र पुढील पाच वर्षात सदर निकष पूर्ण केले नाही तर अशा अक्रियाशील सदस्याचे सभासदत्व रद्द होऊ शकते. मात्र अक्रियाशील सदस्यास निबंधकाकडे दाद मागता येते.

३) सहयोगी / संयुक्त सभासद : सहयाेगी सभासद म्हणजे जो सभासद इतर सभासदांबरोबर संयुक्तपणे संस्थेचा भाग धारण करतो पण ज्याचे नाव भागप्रमाणपत्रावर प्रथम स्थानी नसेल असा सभासद होय. सहयोगी सभासद हा दोन किंवा अधिक क्रमामांकावर असते. सहयोगी सभासदाला कोणतेही अधिकार प्राप्त होत नसतात. या सभासदास सभेत हजर राहण्याचा, मतदान करण्याचा, निवडणूकीस उभे राहण्याचा अधिकार नसतो. जर क्रियाशील सभासद सभेत गैरहजर असेल तरच सभेत हजर राहून मतदान करण्याचा अधिकार असतो. अशा सभासदाला स्वतंत्रपणे भागप्रमाणपत्र दिले जात नाही.

४) नाममात्र / नामधारी सभासद : उपविधीनुसार सहकरी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर नाममात्र सदस्य म्हणून ज्याचे सभासदत्व मान्य केलेले असेल तो नाममात्र सभासद म्हणून ओळखला जातो. या सभासदास फक्त प्रवेश फी भरावी लागते. तो सहकारी संस्थेचे भाग खरेदी करीत नसल्यामुळे त्याचे नाव भागपुस्तकात नसते. त्याला भागप्रमाणपत्र मिळत नाही. व्यवस्थापनात भाग घेणे, निवडणूक लढविणे, अधिमंडळ सभेला हजर राहणे, मतदान करणे, लाभांश मिळविणे इत्यादी अधिकार नामधारी सभासदास नसतात.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 11:28 ( 1 year ago) 5 Answer 7702 +22